जामखेड प्रतिनिधी
एकेकाळी राज्यातील हातमागावर कापड निर्मितीचे महत्वाचे केंद्र असलेल्या खर्डा शहराची जूनी, वैभवशाली ओळख परत मिळणार असून याठिकाणी पुन्हा एकदा हा पारंपारिक व्यवसाय सुरू झाला आहे.
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व सौ.सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा येथे चरख्यावर सूत कातून पैडल लुम्स वर पारंपारिक पद्धतीने प्रत्यक्ष कापड निर्मितीचा ग्रामोद्योग सुरू झाला असल्याने प्रत्यक्षात कापड निर्मिती उद्योग व्यवसायाने वेग घेतल्याचे दिसून येत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी चरखा आणि खादीचे कपडे यांना मोठ्या खुबीने ब्रिटीशांविरुद्धच्या आंदोलनाचे शस्त्र बनवले. त्यांनी चरखा वापरून खादीचे कपडे वापरण्यास प्रोत्साहन देत ते स्वदेशी,स्वावलंबन व भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले. त्याचीच प्रेरणा घेत खर्ड्यासारख्या काही ठिकाणी हातमागावर कापड निर्मिती सुरू झाली. परंतु, कालांतराने कापड निर्मितीसाठी यंत्रमागांचा व नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला व हा पारंपारिक व्यवसाय हळूहळू बंद पडला. पूर्वी विणकाम करणारा कोष्टी समाज आजही खर्डा येथे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतो. सौ.सुनंदा पवार यांनी पुढाकार घेत या कोष्टी समाजासह इतर समाजातील लोकांना एकत्रित करून शिवपट्टण ग्रामोद्योग विकास संस्थेची स्थापना केली. पुढे रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असलेली परंतु सध्या वापरात नसलेली इमारत भाडेतत्त्वावर घेऊन याठिकाणी लाखो रुपये किंमतीचे २५ चरखे, ५ पैडल लुम्स(हातमाग), वार्पिंग मशीन, कांडी मशीन बसवून आवश्यक कच्चा माल पुरवठा केला. याचवेळी बाहेरील प्रशिक्षकांकडून येथील महिला पुरुषांना प्रशिक्षित केले. खर्डा येथील काही महिला पुरुषांनी गुजरात राज्यातील गोंदल येथे जाऊन निवासी प्रशिक्षण घेतले. याचा संपूर्ण खर्च आ.रोहित पवार यांच्या मार्फत करण्यात आला.
सध्या हा ग्रामोद्योग बहरला असून याठिकाणी सुती टॉवेल, सुटींग व शर्टींग चे कापड, रुमाल तसेच जॅकेट साठी आवश्यक असणारे कापड निर्मिती सुरू आहे. अतिशय उच्च दर्जाचे येथील टॉवेलची विक्री सुरू करताच अवघ्या काही मिनिटांतच त्यांची विक्री झाली. हळूहळू इतर कापडांनाही आवश्यकतेनुसार मागणी वाढत आहे.
अशा प्रकारचे ग्रामोद्योग खेड्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थानिक अर्थकारणाला चालना देतात. सध्या येथे महिला चरख्यावर सूत कातून लूम्सवर प्रत्यक्ष कपडा तयार करतात. त्यांना कमी कष्टामध्ये सावलीत काम करुन चांगले पैसे मिळतात. नवीन प्रशिक्षणार्थींना ठराविक छात्रवृत्ती (स्टायपेंड) मिळते. चरखा हाताने चालवतात तर लुम्स चालवण्यासाठी पायांचा वापर होत असल्याने याठिकाणी काम करताना शारीरिक व्यायाम होतो व त्यामुळे कामगारांचे मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले राहते. भविष्यात येथे येणाऱ्या गरजू महिला पुरुषांची संख्या वाढल्यास कामगारांना पाळीने (शिफ्ट) काम मिळेल अशी माहिती संस्थेचे संचालक विजयसिंह गोलेकर यांनी दिली.
येथे विकसित होतोय 'शिवपट्टण' ब्रॅण्ड -
ऐतिहासिक खर्ड्याचे जूने नाव 'शिवपट्टण' असे आहे. याच नावाने येथे उत्पादित कपड्यांचे ब्रॅण्डींग होणार आहे. नवीन उत्पादित केलेल्या टॉवेल वर 'शिवपट्टण' नावाचे कापडी लेबल असणार आहे. खर्डेकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
No comments:
Post a Comment