जामखेड प्रतिनिधी(दत्तराज पवार)
आजच्या ग्रामीण राजकारणात एक वेदनादायक वास्तव स्पष्टपणे दिसून येत आहे प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता नावाचा मुलाधार विसरला जातोय, पक्ष ही केवळ काही नेत्यांची मक्तेदारी नसून ती हजारो निष्ठावंत कार्यकर्त्यांची संघटना आहे. पण दुर्दैवाने हेच कार्यकर्ते आज हळूहळू उपेक्षित होत चालले आहेत. हीच खरी अनेक गावातील कार्यकर्त्यांची अवहेलना होऊन झालेली वेदनादायक परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे.
गावागावात ज्या कार्यकर्त्यांनी घरदार संसार विसरून पक्षासाठी, नेत्यासाठी जीवाचं रान केलं प्रचाराच्या काळात रस्त्यावर उतरून जनतेत नेत्याचे आणि पक्षाचे नाव पोहोचवलं अशा लोकांना निकालानंतर मात्र कोणी विचारत नाही हीच खरी राजकीय वास्तवता आहे, चमकोगिरी करणारे फक्त सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करणारे नेत्यांच्या आजूबाजूला उगाच वावरणारे लोक पुढे येतात व नेत्याचे कान भरतात, पण एक गोष्ट लक्षात घ्या पक्ष जितका प्रामाणिक कार्यकर्त्यावर अवलंबून आहे तितकाच नेता सुद्धा या कार्यकर्त्यांच्या आधारावर मोठा होतो. नेत्याचे वाढदिवस त्यानिमित्ताने घेतलेले अनेक सामाजिक कार्यक्रम कोण घेतात, कुणी सभा भरवतात,तर कोण गर्दी आणण्यासाठी प्रयत्न करतात,तर अनेक कार्यकर्ते सोशल मीडियावर पक्षाचा विचार पसरवतात, हाच खरा निष्ठावंत कार्यकर्ता असतो.
एक एक कार्यकर्ता त्याच्या गावात पक्षाचं व तुमचं नाव मोठं करतो, विरोधी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विरोध घेतो,तुमच्यावर विश्वास ठेवून तुमचं स्वप्न लोकांपर्यंत पोहोचवतो ही गोष्ट कोणत्याही जाहिरात एजन्सीच्या बस की बात नाही हे नेत्यांना लक्षात ठेवायला हवं की कार्यकर्त्यांचे स्थान हे केवळ सभा भरवणारा किंवा बॅनर लावणारा व्यक्ती नसून तो जनतेत तुमचं प्रतिनिधित्व करणारा तुमचा खरा चेहरा असतो.
तो जर तुमच्यावर नाराज असेल त्याला अपमानित वाटत असेल तर तो आवाजही न काढता बाजूला होतो आणि एक कार्यकर्ता बाजूला झाला की नेत्याची ताकद कमी होत असते.
नेत्याने एखाद्या चमकणाऱ्या व्यक्तीला जवळ घेतलं तरी त्याला त्या भागातील इतिहास, संघर्ष, समाजातील दैनंदिन प्रश्न याची पूर्ण जाणीव असतेच असं नाही. पण खऱ्या कार्यकर्त्याने त्या भागाची नस ओळखलेली असते तो जनतेशी जोडलेला असतो त्याच्या हातात पक्षाचं खरं बळ असतं.
आज अनेक ठिकाणी कार्यकर्ते म्हणताना आढळतात साहेब, दादा, भाऊ, भैया ही मानस मोठे झाले, पण आम्हाला विसरले या वाक्याच्या मुळाशी गेल की फार मोठी वेदना दडलेली आहे. पक्ष मजबुत ठेवायचा असेल तर चमकोगिरी करणाऱ्यांना नव्हे तर या व्यथित झालेल्या पण निष्ठावंत कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे.
पक्ष म्हणजे झाड, आणि कार्यकर्ते म्हणजे मुळे आणि नेता म्हणजे फळ. मुळे सडली तर झाड उभा राहत नाही- आणि फळ गळून पडत त्यावेळी नेत्याने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज गरज आहे ती कार्यकर्त्याला ऐकण्याची, त्याला विश्वासात घेण्याची, त्याच्या घामाला त्याच्या त्यागाला किंमत देण्याची आहे,कारण जर तो खचला तर कोणताही नेता कितीही मोठा असला तरी त्याचं राजकीय भवितव्य डळमळीत होणार हे नक्की..
No comments:
Post a Comment